सोमवार, 25 अक्तूबर 2010

राजचा बाळासाहेबांवर हल्ला!

राजचा बाळासाहेबांवर हल्ला!
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 26, 2010 AT 12:30 AM (IST)
 

डोंबिवली - 'सभेला येताना कपडे कोणते घालू, असा विचार करत होतो. कोणतेही कपडे घातले असते तरी म्हणाले असते, माझी कॉपी करतो,'' अशी तडाखेबंद सुरुवात करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रचारसभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच लक्ष्य केले. माझ्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, असे वारंवार सांगतानाच 'मी कॉपी करतो म्हणणाऱ्यांनीच प्रबोधनकार, अत्रेंची कॉपी केली म्हणायचे का?'' असे विचारत त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रथमच तोंडसुख घेतले.

शिवसेनेत मला साधा शाखाप्रमुख नेमण्याचा अधिकार नव्हता, तेथे मी कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नेमणूक कशी करणार, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. बाळासाहेबांनाच उद्धवला कार्याध्यक्ष करायचे होते, पण मी आड येत होतो. समजा, मी उद्धवची नियुक्ती केली असे मानले, तर मग माझा निर्णय योग्य की अयोग्य ते तरी सांगा? अयोग्य असेल, तर तो माणूस अजून त्या पदावर कसा? योग्य असेल तर मग माझे इतर सर्व निर्णय कसे काय चुकले? पक्ष तुमचा, मालक तुम्ही, मग तेथे मी निर्णय कसे घेणार, अशा प्रश्‍नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी केली. केव्हा काय बोलतो ते बाळासाहेबांना आठवत नाही, अशी चौफेर टोलेबाजी करीत आपल्याच "विठ्ठला'चा आणि त्या भोवतीच्या बडव्यांचा त्यांनी यथेच्छ समाचार घेतला. शिवसेनेत आता फक्त खोबरे नसलेल्या करवंट्या आणि शेंदूर फासलेल्या वरवंट्या शिल्लक आहेत, असा घणाघाती हल्ला चढवित शिवसेना-भाजप युतीने सत्तेच्या काळात कल्याण-डोंबिवलीवर बलात्कार केल्याचा आरोपही त्यांनी केला. राज यांच्या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता आणि त्यांच्या प्रत्येक टोलेबाजीला जोरदार प्रतिसाद देत त्यांना प्रतिसादही मिळत होता.

डोंबिवलीच्या कान्होजी जेधे मैदानात मनसेची सभा झाली. यावेळी पक्षाच्या उमेदवारांसोबत अभिनेते भरत जाधवही उपस्थित होते. राज हे शरद पवारांची टेस्ट ट्यूब बेबी असल्याची टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनाही त्यांनी लक्ष्य केले आणि मला मराठी माणसाने टेस्ट केले आहे. मी त्यांची बेबी आहे, असे प्रत्युत्तर दिले. ""शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी आजवर तोडपाणी केले. काहीही काम न करता तुम्ही त्यांना निवडून दिले, म्हणून ते शेफारले आहेत. पूर्वी तुमच्यासमोर शिवसेना-भाजप युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसपलीकडे पर्याय नव्हता. आता मनसेचा पर्याय आहे. आम्हाला संधी द्या. या शहराचा कायापालट करू. मनसेचा प्रत्येक उमेदवार हा राज ठाकरे आहे, असे समजून मतदान करा,'' असे सांगत त्यांनी मनसेला मते देण्याचे आवाहन कल्याण-डोंबिवलीकरांना केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें