बुधवार, 27 अक्तूबर 2010

ठाकरी शैलीत रंगलाय "वस्त्रहरणा'चा प्रयोग

ठाकरी शैलीत रंगलाय "वस्त्रहरणा'चा प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
Thursday, October 28, 2010 AT 01:00 AM (IST)

राज हा वार करणारा "वार'करी - उद्धव ठाकरेडोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतदानासाठी आता चारच दिवस उरले असताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांच्याही जाहीर सभांचे कुरुक्षेत्र बुधवारी चांगलेच रंगले. एकूणच या प्रचारात वैयक्तिक टीका करताना ठाकरी शैलीत एकमेकांच्या "वस्त्रहरणा'चा प्रयोग रंगत आहे. डोंबिवलीच्या "कल्याणा'चा मात्र या ठाकरी कलहात विसर पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

'ज्या बाळासाहेबांना विठ्ठल म्हणतो, त्यांच्यावरच वार करणारा हा वारकरी आहे,'' असा हल्ला चढवत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ""सभेला कपडे कोणते घालू म्हणत होतास; पण कपडे काढल्यासारखा बोललास. माझ्यावर टीका केली, तरी मी गप्प राहिलो; पण बाळासाहेबांवर-माझ्या वडिलांवर हल्ला चढवशील, तर महाभारतातल्या अर्जुनासारखा-षंढासारखा मी गप्प बसणार नाही,'' असे प्रत्युत्तर उद्धव यांनी दिले. येथील युतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत लोकसभेतील भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

रुळावरून घसरलेले रेल्वे इंजिन प्रदूषण करीत फिरत आहे, अशी टीका करताना उद्धव यांनी राज यांच्या प्रत्येक मुद्‌द्‌याचा समाचार घेतला आणि त्यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला. मनसेचा धनसे असा उल्लेख ते सतत करीत होते. 'ज्याला अंगाखांद्यावर खेळविले, त्याने पूर्वी कपडे खराब केले होते. आता मोठा झालास. आता तरी आमचे कपडे खराब करू नकोस,'' असा टोला लगावताना राज यांचा उल्लेख त्यांनी "नालायक', "खंडोजी खोपडे' असा केला. 'शिवसेनेत खोबरे काढलेल्या करवंट्या उरल्या आहेत, असे म्हणून तू शिवसैनिकांचा अपमान केला आहेस; पण तुझ्याभोवती गळकी टमरेलं आहेत. शिवसैनिक होते म्हणून मुंबईच्या दंगलीत हिंदू आणि मराठी माणसे वाचली,'' याचे स्मरण त्यांनी करून दिले.

सत्ता दिलीत, तर विकासासाठी मी कल्याण-डोंबिवलीत पंधरवड्यातून तीन दिवस मुक्काम ठोकेन, असे राज यांनी जाहीर केले होते, त्याचा संदर्भ देत उद्धव म्हणाले, ""इथे तिथे मुक्काम ठोकायला मी नाटकी नाही आणि गाव दिसले की मुक्काम टाकायला ही काही तमाशाची बारी नाही.'' शिवसेनेत अधिकार नव्हते, तर राजला नाशिकचा विकास कसा करता आला, असा प्रश्‍नही त्यांनी केला. तुझा लढा नेमका कोणाशी, शिवसेनेशी की कॉंग्रेसशी, हे एकदा जाहीर कर, असे आव्हानही त्यांनी राज यांना दिले.

युतीमुळे कल्याण-डोंबिवलीचा सत्यानाश - राजकल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा मनसेचा "वचकनामा' राज ठाकरे यांच्या हस्ते डोंबिवली पूर्वेतील हेरिटेज हॉलमध्ये प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, रमेश पाटील, शिशिर शिंदे, राजन गावंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी राज यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

'शिवसेनाप्रमुखांनी नऊ वर्षांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाच्या नेमणुकीचा मुद्दा उकरून काढला आहे. एकच मुद्दा किती वेळा बोलणार आहात, असे मी डोंबिवलीतील प्रचारसभेत भाषणाच्या सुरवातीला "कॉपी'च्या आणि उद्धवच्या नेमणुकीच्या मुद्‌द्‌याला उत्तर दिले; बाकीचे सगळे भाषण कल्याण-डोंबिवली शहरातील समस्यांशी निगडित होते,'' याकडे राज यांनी लक्ष वेधले. ""माय नेम इज खान' या चित्रपटाला विरोध करून त्यानंतर त्याच चित्रपटाची जाहिरात शिवसेनेच्या मुखपत्रात छापण्यात आली. ही जाहिरात मागितलेली होती. आता ते म्हणतील की, जाहिरात त्यांनी (शाहरुखच्या कंपनीने) पाठविली होती. पण मग ती नाकारण्याचा अधिकार होता ना,'' असा सवाल राज यांनी केला व आंदोलनासाठी लाठ्या खाणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची बाजू मांडली. राज यांनीच महाबळेश्‍वर येथे उद्धव यांना कार्याध्यक्षपदी निवडल्याची चित्रफीत शिवसेना प्रचारात दाखविणार आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, "ती फिल्म दाखवून काय साध्य होणार,' असा प्रतिप्रश्‍न राज यांनी केला.

'ठाकरे घराण्यातील भांडणे कल्याण-डोंबिवलीच्या निवडणूक रिंगणात कशाला?''

अशी ओरड आघाडीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले, 'आधी त्यांनी त्यांचे धोतर सांभाळावे. मग आमच्या वादाविषयी बोलावे. दोन महिने मी काहीच बोललो नव्हतो, तेव्हा काहीच बोलत नाही, अशी टीका सुरू होती. आता तोंड उघडले की म्हणतात, "पेटवतो'.'' "दोन ठाकरेंमधील वादामुळे मराठी मतांचे विभाजन होत नाही का,' असा प्रश्‍न विचारला असता, 'कॉंग्रेस-राष्ट्रवादीला काय कानडी माणूस मतदान करतो का? हे प्रश्‍न मराठी माणसाला विचारले गेलेच पाहिजेत. कारण मतदान तो करणार आहे.''

'पालिकेत गेली साडेबारा वर्षे सत्तेत असलेली युती राज्य सरकारने सापत्न वागणूक दिली, शहर विकासाला निधी दिला नाही,'' असा प्रचार करीत आहे. त्यावर 'राज्य शासन कामे अडवून ठेवत असेल आणि निधी देत नसेल तर शिवसेना-भाजप युती निवडणुका लढवितेच कशाला. नका लढवू निवडणुका,'' असा टोला राज ठाकरे यांनी मारला.

'जनतेच्या कामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली की युतीचे नेते आघाडीशी आतून समझोता झाल्याची टीका करतात. ते भेटले की क्रांती आणि आम्ही भेटलो की डील? आमच्यावर अशी टीका करणारी शिवसेना-भाजप युती निवडणुका लढवितेच कशाला? त्यांनी निवडणुका लढवू नयेत,'' असे सडेतोड उत्तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी युतीच्या नेत्यांना दिले.

'ऐतिहासिक वारसा असलेल्या, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणमध्ये ज्यांच्या हाती भगवा झेंडा होता, त्यांनी कल्याण-डोंबिवली शहराचा सत्यानाश केला,'' अशी जळजळीत टीका राज ठाकरे यांनी रात्री झालेल्या प्रचारसभेत केली.

'पत्रकारांनी मला प्रश्‍न विचारला की, तुम्हाला विकासकामांचा अनुभव काय? मग सांगा, लग्नाच्या वेळी अनुभव विचारला जातो का? माझा आत्मविश्‍वासच हा माझा अनुभव आहे. कल्याणची परंपरा ऐतिहासिक आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकले होते. त्या वेळी कल्याणमध्ये त्यांना सोन्याच्या मोहोरांचे हंडे सापडले होते. आता हंडा सापडत नाही. सगळे गिळून टाकले सत्ताधारी पक्षाने. पहिल्या बाजीरावांचे लग्न कल्याणमध्ये झाले; पण या ऐतिहासिक शहराची युतीने विल्हेवाट लावली. नगरसेवकांनी काय करून ठेवले आहे, याचा बाळासाहेबांना पत्ताच नाही. युतीने कल्याण-डोंबिवली शहरे भकास करून ठेवली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें