
जळगाव
- मराठी माणसासाठी एकत्र येण्याची गरज असताना मराठा आरक्षण आंदोलनाच्या
नावाखाली लोकांची माथी भडकविण्याचे उद्योग राज्यातील आघाडी सरकारकडूनच
करण्यात येत आहेत. मराठी माणसांची जाती-जातींत वाटणी करून मत विभागणीचे
सरकारचेच षडयंत्र आहे, अशी सडकून टीका मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केली.
जळगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
ठाकरे यांच्या महाराष्ट्र
दौऱ्याची सांगता आज जळगाव येथील सभेने झाली. सागर पार्कच्या भव्य मैदानावर
झालेल्या सभेस नागरिकांची प्रचंड उपस्थिती होती. व्यासपीठावर आमदार बाळा
नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, माजी आमदार जयप्रकाश
बाविस्कर उपस्थित होते.
राज ठाकरे पुढे म्हणाले, की छत्रपती
शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळी समाजाचे, लोकमान्य टिळक
ब्राह्मणांचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे अशी महाराष्ट्रातील
महापुरुषांचीही जातीनिहाय वाटणी या नेत्यांनी आपल्या राजकारणासाठी करून
टाकलेली आहे, तिथे जनसामान्यांना काय गोष्ट लावली? जातीवरून माथी
भडकविण्याचे काम नुसतेच सत्ताधारी करताहेत, असे नाही. सत्ताधारी आणि विरोधक
मिळून हाच एक उद्योग करीत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने आता सावध झाले
पाहिजे. महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येत
नाहीत, परंतु जातीचे राजकारण करण्यासाठी मात्र दोघे एकत्र येतात.
महाराष्ट्रातील जनतेने विशेषत: युवकांनी जाती-पातीचे हे राजकारण मोडून
काढण्याची वेळ आली आहे. सावध होण्याची वेळ आलेली आहे. इथले राजे गाफील आहेत
म्हणूनच परप्रांतीयांना इथे फावते आहे. अशाच एका गाफील क्षणांत
अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचा बुलंद किल्ला काबीज केला होता. पुढे शिवाजी
महाराजांनी महाराष्ट्रात ऐक्याचा जागर केला आणि परिस्थिती बदलली. इथे
उद्योग उभारायचा तर मराठी तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत, अशी अट अन्य
सगळ्या प्रांतांतून घातली जाते, पण महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांकडून तसे
काहीही होत नाही. महाराष्ट्र सगळ्यांना मोकळा करून दिलेला आहे आणि इथल्या
तरुणांचा मात्र श्वास गुदमरतो आहे. मराठी तरुणांना नोकऱ्यांसाठी मी भांडतो
तर माझ्यावर केसेस केल्या जातात. आजमितीला माझ्यावर 89 केसेस आहेत, मला
त्यामुळे काहीही फरक पडत नाही. मेलेल्या कोंबड्याला कसली आली आगीची भीती,
असा सवालही त्यांनी केला.
मुद्दाम विभागला महाराष्ट्र राज
पुढे म्हणाले, ""संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन करण्यात आले. अनेकांनी
हौतात्म्य पत्करले, परंतु आज विभागनिहाय महाराष्ट्र विभक्त करण्यात आला
आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा
अस्मिता जाणीवपूर्वक रुजवण्यात येत आहेत. महाराष्ट्र एक आहे.
महाराष्ट्रातले प्रश्न सारखेच आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचा प्रश्न
आहे. महाराष्ट्राची अशी विभागणी योग्य नाही. मला एकसंध महाराष्ट्रच दिसतो.
माझा मतदार संघ म्हणजे महाराष्ट्र आहे.''
मराठी मुलांना नोकऱ्या हव्याच महाराष्ट्रात
मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. खासगी उद्योगांतूनही त्यांना
प्रथम प्राधान्य मिळालेच पाहिजे. त्यांच्यासाठी मी काल लढत होतो. आज लढतो
आहे आणि उद्याही लढत राहीन. तमिळनाडू, गुजरात, आसाम राज्यात तेथील स्थानिक
मुलांना सर्वत्रच नोकऱ्यांत प्राधान्य दिले जाते, मग महाराष्ट्रात का नाही?
महाराष्ट्रात मराठीतच कारभार झाला पाहिजे. प्रत्येक दुकानाबाहेर मराठीत
पाटी लागलीच पाहिजे. मराठी भाषेला महाराष्ट्रातच दुय्यम दर्जा मी खपवून
घेणार नाही.
गर्दीचा भ्रमनिरास! राज
ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ
खडसे, जळगावच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार सुरेशदादा जैन
यांच्याबाबत ते काहीतरी बोलतील, अशी जनतेची अपेक्षा होती. राज यांनी केवळ
एका वाक्यात बोळवण करून लोकांची निराशा केली. कुठल्याही स्थानिक
प्रश्नावर वा विषयावर ते बोलले नाहीत, यामुळे निराशा झाली, असे अनेकांनी
सभेतून परतताना सांगितले.
अजित पवारांना पैशांचा माज! राज्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. राज म्हणाले,
""महाराष्ट्रातील जनता पाण्यासाठी होरपळतेय आणि अजित पवार म्हणतात, धरणात
पाणी नाही म्हणून मी "मुतू' काय? त्यांना पैशाचा माज आलाय. त्यामुळेच
त्यांनी अशी गलिच्छ भाषा वापरली आहे, मात्र येत्या 2014 च्या विधानसभा
निवडणुकीत अजित पवार मत मागतील तर त्यांना हीच जनता "मूत' देईल आणि त्यांना
आपल्या "मुतात' वाहूनही टाकील.
जैन, खडसेंनी उधळले 95 कोटी राज्याचे
विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे व आमदार सुरेशदादा जैन यांचा थोडक्यात
समाचार ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले, नागपूर येथे नितीन गडकरी यांच्या
मुलाच्या लग्नात सुरेशदादा भेटले, त्यांनी मला भेटण्याचा निरोप दिला, ते
भेटले त्यावेळी ते म्हणाले (सुरेशदादांची नक्कल करून) विधानपरिषद निवडणुकीत
मी 45 कोटी खर्च केले, नाथाभाऊनी 40 कोटी खर्च केले. खरंच एका साध्या
आमदारासाठी दोघांनी 95 कोटी खर्च केले असतील तर ते दुर्दैवच आहे. आज
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय पण निवडणुकीत एवढा पैसा खर्च होतो. हे
चित्रही तुम्हाला बदलावे लागणार आहे.